सावली शहरात मुख्य नालीचे खोलीकरण गायब, रुंदीही कमी
बांधकाम विभागासह न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
शहरातील मुख्य नालीच्या बांधकामाने सध्या वेग घेतला असला तरी प्रत्यक्षात नालीची सफाई, उपसा, खोलीकरण आणि रुंदीकरण न करताच बांधकामाचा सपाटा लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना कामाच्या दर्जाबाबत आणि नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरातील ही मुख्य नाली अनेक वर्षांपासून गाळाने भरलेली होती पूर्वी सिमेंट काँक्रीटच्या फरशा टाकून नाली बंदिस्त करण्यात आली होती. त्यानंतर नालीची काहीशी सफाई किंवा प्रभावी गाळ उपसा झालाच नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा परिस्थितीत नालीतील साचलेला गाळ थातुर मातुर उपसा करत नव्या बांधकामाला सुरुवात करण्यात आल्याने भविष्यात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका अधिक वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे जुनी नाली आकाराने मोठी असताना तिचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याऐवजी नव्या बांधकामात नालीचा आकारच कमी केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या पाण्याचा निचरा कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यातही मुख्य नालीवर गेल्या अनेक वर्षांपासून संडास, बाथरूम, टिनशेड, वॉल कंपाउंड यांसारख्या अतिक्रमणांचे जाळे पसरलेले आहे. या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची शक्यता कायम निर्माण होत होती. आता नाली बांधकामा दरम्यान कामाला अडथड़ा निर्माण होत असल्याने नालीवरील अतिक्रमणे हटविल्या जात आहेत ही कारवाई कायमस्वरूपी आहे की तात्पुरती, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
राष्ट्रीय महामार्गानंतर गावातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यातच अतिक्रमनाने अरुंद होत चाललेला रस्ता यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अशावेळी नालीवरील अतिक्रमण पुन्हा उभे राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे. लाखो रुपयांच्या निधीचा वापर होत असताना कामाची गुणवत्ता आणि तांत्रिक निकषांची अंमलबजावणी होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नालीवरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवून हा मार्ग मोकळा ठेवण्याची हिंमत नगरपंचायत प्रशासन दाखविणार का? की बांधकाम पूर्ण होताच पुन्हा अतिक्रमणांचे साम्राज्य उभे राहणार? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाच्या पुढील भूमिकेतूनच मिळणार असून संपूर्ण सावलीकरांचे लक्ष आता नगरपंचायतीच्या निर्णयाकडे लागले आहे.
*”नाली बांधकाम की निधीचा अपव्यय?”*
सुरु असलेल्या मुख्य नालीचा थातुर मातुर उपसा, खोलीकरण नाही, रुंदीकरण नाही आणि अतिक्रमणा बाबत स्पष्ट धोरणही नाही. त्यामुळे सुरू असलेले काम खरोखरच शहराच्या विकासासाठी योग्य आहे की केवळ निधी खर्च करण्यासाठी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे तेव्हा बांधकाम विभासगा सह स्थानिक न.प.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे.
*नगरपंचायत प्रशासनाचे मौन*
मुख्य नालीचे कथित निकृष्ट दर्जाचे बांधकाम, नालीचे खोलीकरण व रुंदिकरनाचा अभाव, थातुर मातुर उपसा असे सुरू असलेले काम तसेच नालीवरील अतिक्रमणाबाबत नगरपंचायत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. नालीवरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटविण्यात येणार की पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होणार, याबाबतही प्रशासन मौन बाळगून आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कामाच्या दर्जा व पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी होत आहे.



