अनुलोमच्या ‘गुरू गौरव’ उपक्रमातून गुरुजनांचा सन्मान
'एक विद्यार्थी – एक वृक्ष'चा दिला संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- भारतीय संस्कृतीत गुरुंना सर्वोच्च स्थान असून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. या भावनेला उजाळा देत अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) यांच्या वतीने विविध शाळांमध्ये ‘गुरू गौरव’ उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक हे केवळ ज्ञानदान करणारे नसून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून ‘गुरू सन्मान प्रतिज्ञा’ घेण्यात आली. गुरुजनांचा आदर राखणे, त्यांच्या मार्गदर्शनाचे प्रामाणिकपणे पालन करणे, आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करणे आणि आपल्या आचरणातून गुरुंचा मान वाढविण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ हा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
स्व. त्रिवेणीबाई डोहे आश्रम शाळा (मांडवा), स्व. भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा (कोरपणा), जिल्हा परिषद हायस्कूल (कन्हाळगाव), हरिभाऊ डोहे विद्यालय, वसंतराव नाईक विद्यालय, शिवाजी विद्यालय (माथा), रविंद्रनाथ टागोर विद्यालय (कोडशी बु.), महात्मा गांधी विद्यालय (सोनुर्ली), शासकीय आश्रम शाळा (धानोली), महात्मा गांधी विद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, आदर्श हिंदी विद्यालय (गडचांदुर), जवाहरलाल नेहरू विद्यालय (आवाळपूर), प्रभू रामचंद्र विद्यालय (नांदा), किसान विद्यालय (नारंडा), शिवाजी विद्यालय (अंतरगाव) तसेच वनिता आश्रम (इंजापूर) येथे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदरभाव अधिक दृढ झाला असून पर्यावरण संरक्षणाबाबतही जनजागृती झाली आहे. समाजात संस्कार, कृतज्ञता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली रुजविण्यासाठी असे उपक्रम पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.



