राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
सावली :- भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली येथे मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या सुप्त सृजनशीलतेला वाव मिळावा तसेच साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने सृजनात्मक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कथा, कविता, ललित लेख, अनुभवकथन आदी विविध साहित्यप्रकारांमध्ये दर्जेदार लेखन सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेसह सामाजिक जाणीव, भाषिक समृद्धी आणि साहित्यिक अभिव्यक्तीचा उत्कृष्ट आविष्कार यावेळी पाहायला मिळाला.
प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करून समाजाभिमुख विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. लेखन ही व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी प्रक्रिया असून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन आणि सातत्यपूर्ण लेखनाची सवय जोपासावी, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयन मराठी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. महाविद्यालयात साहित्य, भाषा आणि सृजनशीलतेला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन संस्कृती विकसित होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



