सावधान! ‘मोबाईल अपडेट’ आणि ‘फ्री मनोरंजन अॅप्स’च्या नावाखाली बँक खाती साफ करणारी नवी टोळी सक्रिय
सायबर पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी अत्याधुनिक आणि घातक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या ८ ते १० दिवसांत अशा प्रकारच्या तक्रारींचा महापूर आला असून, मोबाईलवर मोफत चित्रपट, व्हिडिओ किंवा लाईव्ह टीव्ही पाहण्याच्या नादात नागरिकांचे मोबाईल पूर्णपणे हॅक केले जात आहेत. या नव्या सायबर सापळ्याबाबत नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे जाहीर आवाहन सायबर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
फ्री स्ट्रीमिंग अॅप्सचे आमिषः सोशल मीडिया किंवा अज्ञात लिंक्सवरून नागरिकांना मोफत चित्रपट किंवा टीव्ही पाहण्यासाठी “Tube TV” सारखी किंवा मनोरंजन करणारी अनधिकृत अॅप्स किंवा (.apk) फाईल्स डाऊनलोड करण्याचे आमिष दाखवले जाते. हे अॅप डाऊनलोड होताच ते मोबाईलमध्ये Notification Access (नोटिफिकेशन पाहण्याची परवानगी), Accessibility Service किंवा Device Administrator सारख्या अत्यंत संवेदनशील परवानग्या मागतात. वापरकर्त्याने नकळत या परवानग्या दिल्यास मोबाईलचा ताबा अंशतः सायबर गुन्हेगारांकडे जातो. या परवानग्याचा गैरवापर करून सायबर भामटे मोबाईल स्क्रीनवर आपोआप “Mobile System Update” किंवा “Security Update” चे बनावट नोटिफिकेशन पाठवतात. नागरिकांनी या बनावट नोटिफिकेशनवर क्लिक करताच मोबाईलमध्ये अत्यंत घातक ‘मालवेअर’ (व्हायरस) इन्स्टॉल होतो. यामुळे मोबाईल स्क्रीन पूर्णपणे लॉक किंवा फ्रीझ होते आणि वापरकर्त्याला काहीही करता येत नाही. मोबाईल हॅक झाल्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील, पासवर्ड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेचे OTP परस्पर चोरून घेतात आणि काही क्षणात बँक खात्यातील संपूर्ण रक्कम लांबवतात.
सायबर पोलिसांतर्फे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना
कोणतेही अॅप्स डाऊनलोड करताना केवळ अधिकृत अॅप्स स्टोअरचाच वापर करा. कोणत्याही त्रयस्थ (Third-party) वेबसाईट किंवा सोशल मीडियावरील लिंकवरून अॅप्स डाऊनलोड करू नका मोबाईलमध्ये कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना ते कोणती परवानगी मागत आहे, हे तपासा. Notification Access किंवा Accessibility सारख्या परवानग्या अनोळखी अॅप्सना कधीही देऊ नका. स्क्रीनवर अचानक येणाऱ्या “Mobile System Update” किंवा तत्सम नावाच्या कोणत्याही पॉप-अप नोटिफिकेशनवर क्लिक करू नका. मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट हे नेहमी फोनच्या अधिकृत “Settings System Update याच सुरक्षित मार्गाने करावे. बँकिंग व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) आणि बायोमेट्रिक लॉक (फिंगरप्रिंट) यांसारख्या अतिरिक्त सुरक्षा सुविधांचा वापर करा.
जर अचानक मोबाईल स्क्रीनवर संशयास्पद हालचाली दिसल्या, तर तातडीने मोबाईलचा इंटरनेट/वाय-फाय डेटा बंद करा किंवा फोन ‘Switch Off’ करा, जेणेकरून सायबर गुन्हेगारांचा तुमच्या फोनशी असलेला संपर्क तुटेल. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास किंवा आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी न घाबरता तातडीने केंद्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० (1930) वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी. तसेच तात्काळ आपल्या बँक आणि स्थानिक सायबर पोलिसांशी संपर्क साधावा,
(अनिल मेश्राम) पोलिस निरीक्षक पो. स्टे सायबर वर्धा


