सेवानिवृत्त अंमलदार व मृत अंमलदारांच्या वारसांसाठी विशेष बैठक संपन्नः प्रलंबित देयके व अडचणी तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, अंमलदार आणि सेवेदरम्यान मयत झालेल्या अंमलदारांच्या नातेवाईकांच्या प्रलंबित पेन्शन व इतर आर्थिक देयकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आज दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मिटिंग हॉल येथे एक विशेष बैठक संपन्न झाली. मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या.
बैठकीदरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि मयत अंमलदारांच्या वारसांशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. पोलीस दलासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हक्क त्यांना वेळेवर मिळाले पाहिजेत, हा या बैठकीमागचा मुख्य उद्देश होता. बैठकीत सेवानिवृत्तीनंतर काही तांत्रिक कारणांमुळे रखडलेली पेन्शन प्रकरणे आणि भविष्य निर्वाह निधीची (GPF) देयके तात्काळ मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण (Leave Encashment) आणि पदोन्नतीसंबंधीचे प्रलंबित एरिअर्स तातडीने देण्याबाबत संबंधित लिपिकांना सूचना देण्यात आल्या. मयत अंमलदारांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरी किंवा इतर थकीत देयके मिळण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.
बैठकीत समोर आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत मा. पोलीस अधीक्षकांनी मानव संसाधन (कल्याण) शाखा आणि लेखा विभागाला कडक निर्देश दिले की, कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला किंवा मयत अंमलदाराच्या कुटुंबाला कार्यालयाचे चकरा माराव्या लागू नयेत. सर्व प्रलंबित देयके आणि प्रशासकीय त्रुटी कालमर्यादेत (Time-bound) दुरुस्त करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात यावा.
पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक पुढाकारामुळे उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी वर्धा जिल्हा पोलीस दलाचे मनापासून आभार मानले आहेत.
(आशिष चिलांगे)
सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा


