ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रशासन आले गावात! जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचा थेट लसनपूरमध्ये ग्रामसंवाद

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची उपस्थिती

वर्धा : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एक दिवस ग्रामस्थांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वान्मथी सी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर गावाला भेट दिली. यावेळी आयोजित थेट ग्रामसंवाद कार्यक्रमात त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच समस्या तात्काळ निराकरणासाठी संबंधित विभागांना संवेदनशीलतेने पावले उचलण्याचे निर्देश दिले.

 ग्रामसंवाद कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शोभिका पाठक, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, समुद्रपूरचे तहसीलदार कपिल हाटकर आणि गटविकास अधिकारी सतीश टिचकुले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी वान्मथी सी व मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी लसनपूर येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन तिथल्या कामकाजाची पाहणी केली. तसेच, महिला बचत गटाच्या उद्योजक मालाची विक्री करणाऱ्या फिरत्या केंद्राला भेट देऊन महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी गावातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेऊन, कामांचा दर्जा राखत ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

थेट संवादादरम्यान लसनपूरच्या ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, रस्ते, वीजपुरवठा, महसूल विषयक प्रकरणे, शेतीविषयक अडचणी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींबाबतचे प्रश्न मांडले. यावर बोलताना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ग्रामविकासामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनीही स्थानिक पातळीवर समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिला बचतगटांनी केवळ उत्पादन न करता स्थानिक व व्यापक बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करावा. बाजारपेठेची गरज ओळखून दर्जेदार उत्पादने तयार केल्यास महिलांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.

गावातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व दर्जेदारपणे नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले. नियमित समुपदेशन व जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना यावेळी दिल्या. एक निरोगी व सशक्त समाज घडवण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करून व्यसनमुक्ती अभियानाला गावपातळीवर व्यापक स्वरूप द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या विशेष ग्रामसंवाद कार्यक्रमाचे औचित्य साधून अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका, आयुष्मान भारत योजनेचे आरोग्य कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांतर्गत पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर वाटपाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये