लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, युनिट-1 यांच्या वतीने ‘GET Night’ कार्यक्रमाचे आयोजन
राजीव गांधी अभियांत्रिकी व संशोधन तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती

चंद्रपूर :- लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, युनिट-1 यांच्या वतीने ‘GET Night’ कार्यक्रमाचे आयोजन 21 जुलै 2026 रोजी ग्रँड आयकॉन हॉटेल, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी 2025 बॅचमधील ग्रॅज्युएट इंजिनिअर (GET) विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला, तर 2026 बॅचमधील नव्या GET विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट)द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत नव्या व्यावसायिक प्रवासासाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. स्तुती साने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग–शैक्षणिक समन्वय अधिक दृढ करणे आणि सातत्यपूर्ण प्लेसमेंटसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड श्री. वाय. जी. एस. प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, व्यावसायिक मूल्ये, कार्यसंस्कृती आणि यशस्वी करिअरसाठी आवश्यक गुणांविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सातत्याने ज्ञान आत्मसात करून शिस्त, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि कामगिरीचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल, यशस्वी व प्रगतीशील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



