शासकीय औ. प्र. संस्थेत कारगील विजय दिवस साजरा
माजी सैनिक जयप्रकाश चिने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर :- ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कारगील विजय दिवसाचे आयोजन डिजिटल लायब्ररी कक्षात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासेयो सल्लागार तथा प्रभारी गटनिदेशक बंडोपंत बोढेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून इंडियन आर्मी चे माजी सैनिक श्री. जयप्रकाश चिने, कार्यक्रम अधिकारी गटनिदेशक श्री. राजु श्रीरामे, गटनिदेशक श्री. जितेंद्र टोंगे, अधिक्षक श्री. कंगाले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिदेशक राजु श्रीरामे यांनी केले. काश्मीर भूभागात असलेल्या आतंकवाद्याचा खातमा करणे तसेच चायना बार्डरवर देशाचे संरक्षण करण्याचे काम सैनिक म्हणून मी केले आहे .एक सैनिक म्हणून मला देशाची उत्तम सेवा करता आली हे माझे भाग्य समजतो, असे मनोगत माजी सैनिक जयप्रकाश चिने यांनी व्यक्त केले. कारगील विजय दिवस म्हणजे देशाच्या इतिहासातील राष्ट्राभिमानाचा , सैनिकांच्या शौर्याचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा दिवस आहे. आपल्या शूर वीरांच्या त्यागाचे स्मरण सदैव केले पाहिजे, असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले. संस्थेच्या वतीने जयप्रकाश चिने यांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ. अनिता ढेंगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशक श्री. एन. टी. गराड यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.



