वेंडली येथे दिवं. ओमदेव चालूरकर स्मृती प्रित्यर्थ ग्रामगीता ग्रंथ वितरण आणि जनप्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथून जवळच असलेल्या वेंडली येथे दिवं. ओमदेव बळीराम चालूरकर यांच्या गंगापूजन कार्यक्रम निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता वाचन, प्रबोधन आणि ग्रंथ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. यावेळी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा समितीचे गोंडपिपरी तालुका प्रमुख सुभाष पावडे , वेंडली श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग वरारकर, उपाध्यक्ष रवींद्र पिंपळशेंडे , भजन गायक संजय बोढाले (देवाडा), ज्येष्ठ प्रचारक महादेव हुलके (खैरगाव) यांची उपस्थिती होती.
श्रीगुरुदेव सामुदायिक प्रार्थना मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात प्रथमतः ग्रामगीता ग्रंथातील देवदर्शन अध्यायाचे वाचन कवी महादेव हुलके यांनी केले. तर ग्रामगीता ग्रंथ अनुषंगाने सुभाष पावडे यांनी विचार प्रकटन केले . बंडोपंत बोढेकर यांनी दिवं. ओमदेव चालूरकर यांचे कार्यजीवनावर प्रकाश टाकत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता यावर विचार व्यक्त केले. ओमदेव चालूरकर यांच्या स्मृतीस्तव त्यांचे नातेवाईक श्री. बंडू उरकुडे,रमेश आस्वले, गजानन आस्वले, संजय टोंगे, सुभाष टोंगे, मारोती देवाळकर, देवराव मोरे, डॉ.सुभाष ठावरी,अविनाश ठावरी,श्री. मारोती पिंपळशेंडे, पांडुरंग कोटे, प्रा. आलोक खोब्रागडे ,बंडू मोहितकर,देवानंद ढुमणे आदींना पुष्पगुच्छ व ग्रामगीता ग्रंथ भेट देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोवर्धन चालुरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन योगेश चालूरकर यांनी केले. श्रद्धांजली व राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने नातेवाईक व वेंडली ग्रामवासीय मंडळी उपस्थित होते.


