ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांदा चाळ वादातून महिलेला शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

शेतीच्या जुन्या वादाचे पडसाद; सावखेड भोई येथे दोन महिलांविरुद्ध गुन्हा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : तालुक्यातील सावखेड भोई येथे शेतीच्या जुन्या वादातून झालेल्या वादावादीत एका महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. अरुणा कारभारी डोणे (वय ४०, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रुख्मिणी तुकाराम डोणे (वय ३२) व गंगा पवार (वय ४०, मूळ रा. आळंदी, ह.मु. सावखेड भोई) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९६, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे परस्पर नातेवाईक असून त्यांच्यात शेतीच्या मालकीसंदर्भात जुना वाद आहे. सदर प्रकरण सध्या दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. १० जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सावखेड भोई शिवारात फिर्यादी आणि त्यांचे पती कांदा चाळीतून विखुरलेले कांदे जमा करीत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले आणि “तुम्ही आमचे कांदे का भरता?” असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, फिर्यादी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच अश्लील हातवारे करून पुन्हा येथे दिसल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अप. नं. २६७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. संजय गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महिला पोलीस अंमलदार निलीमा जाधव यांनी पूर्ण केली.

दरम्यान, शेतीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये