वीज बिलाच्या वादातून महावितरण कार्यालयात राडा; वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा
९ हजारांच्या वीज बिलावरून संताप; सरकारी कामात अडथळा, कार्यालयाची काच फोडल्याचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : वीज बिलाच्या रकमेबाबत झालेल्या वादातून देऊळगावमही येथील महावितरण कार्यालयात गोंधळ घालत वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण केल्याचा तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून कार्यालयाची मालमत्ता नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णू माधवराव जायभाये (वय ४५) हे महावितरणच्या देऊळगावमही कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे अमोना (ता. चिखली) येथील रहिवासी असून सध्या नोकरीनिमित्त देऊळगावमही येथे कार्यरत आहेत. या प्रकरणातील आरोपी राहुल राजेंद्र साळवे आणि स्वप्नील राजेंद्र साळवे, दोघेही रा. देऊळगावमही, अशी नावे आहेत.
फिर्यादीनुसार, गुरुवारी (११ जून) दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास आरोपी महावितरण कार्यालयात आले. “आम्हाला ९ हजार रुपयांचे वीज बिल कसे आले?” या कारणावरून त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी वरिष्ठ तंत्रज्ञ विष्णू जायभाये यांच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपींनी संगनमताने फिर्यादीस चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सुरू असलेल्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कार्यालयातील खिडकीची काच फोडल्याने शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर विष्णू जायभाये यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल साळवे व स्वप्नील साळवे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(१), २९६, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची नोंद गुन्हा क्रमांक २६८/२०२६ अशी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर करीत आहे. दरम्यान, शासकीय कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा रंगली असून सार्वजनिक सेवेशी संबंधित कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.


