अल्ट्राटेक सिमेंट आवारपूरमध्ये कामगारांमध्ये वाढता असंतोष
व्यवस्थापनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह; ठेकेदारी कामगार एकवटू लागले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची ओळख असलेल्या अल्ट्राटेक समेंट आवारपूर प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून कामगारांमध्ये असंतोष वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. कंपनी उत्पादन आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करत असताना दुसरीकडे ठेकेदारी कामगारांमध्ये असुरक्षितता, भेदभाव आणि व्यवस्थापनाच्या धोरणांविषयी नाराजी वाढत असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, मागील तीन ते चार वर्षांपासून कंपनीत अशांतता आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवस्थापनाकडून दडपशाहीची वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत असून, कामगारांमध्ये फूट पाडण्याचे धोरण राबविले जात असल्याची भावना अनेक ठेकेदारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ३० ठेकेदारी कामगारांच्या वेतनात प्रतिदिन ५० ते १५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र ही वाढ कोणतेही स्पष्ट निकष अथवा पारदर्शक प्रक्रिया न राबविता करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे काही कामगारांना लाभ मिळाला तर अनेक जण वंचित राहिल्याने कामगारांमध्ये मतभेद आणि नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने ठेकेदारी कामगार पुन्हा जुन्या कामगार संघटनांकडे वळत असून, आपल्या प्रश्नांसाठी संघटित होण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. कामगारांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी कामगार नेते आणि माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांची आवारपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती कामगार वर्तुळातून समोर येत आहे.
दरम्यान, ठेकेदारी कामगारांना दोन गणवेशांच्या शिवणखर्चासाठी ९०० रुपये देण्यात आले होते. मात्र संबंधित टेलर्स आणि मध्यस्थांमार्फत कामगारांकडून अतिरिक्त 300/- रुपये रक्कम घेतल्याच्या तक्रारही पुढे आल्या आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.
कंपनीच्या शाळेच्या शुल्कवाढीवरूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार, शाळेचे वार्षिक शैक्षणिक शुल्क सन २०२३-२४ मध्ये सुमारे ६ हजार रुपये होते. त्यानंतर ते ११ हजार रुपये करण्यात आले असून चालू शैक्षणिक वर्षात ते सुमारे १७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. ही रक्कम थेट पगारातून कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत असून शुल्कवाढीबाबत पालकांशी पुरेशी चर्चा करण्यात आली नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे. अल्प वेतनावर काम करणाऱ्या कामगारांसाठी मुलांचे शिक्षण परवडणे कठीण होत असल्याचे अनेकांनी नमूद केले.
याशिवाय, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनपर लाभांमध्येही कपात करण्यात आल्याची तक्रार काही कामगारांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेचे प्रमाण कमी करण्यात आले असून त्याबाबतही कामगारांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
एकूणच, आवारपूर प्रकल्पात ठेकेदारी कामगारांचे प्रश्न, वेतनातील कथित भेदभाव, शुल्कवाढ, प्रोत्साहनपर लाभांमधील बदल आणि व्यवस्थापनावरील आरोप यामुळे असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे. या सर्व मुद्द्यांवर कंपनी व्यवस्थापनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करून कामगारांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


