युवा पिढीने इतिहासातून नेतृत्वाचे धडे घ्यावेत – आ. किशोर जोरगेवार
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र हे केवळ शौर्य आणि पराक्रमाची गाथा नसून उत्कृष्ट नेतृत्व, दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे जिवंत विद्यापीठ आहे. आजच्या युवा पिढीने इतिहासाकडे केवळ भूतकाळ म्हणून न पाहता, त्यातून नेतृत्वाचे धडे घेणे आवश्यक आहे. निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करत नेतृत्वाचे हेच धडे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी विभाग आघाडी च्या वतीने “शिवशाही ते आजची लोकशाही” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज पक्षाच्या महानगर कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री नामदेव डाहुले, श्याम कनकम, बलराम डोडाणी, निलेश बेलखेडे, विमल कातकर, राजकुमार आक्कापल्लीवार, राकेश नाकाडे, सलीम शेख, प्रलय मशाखेत्री आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षणाची आठवण करून देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर तो स्वाभिमान, स्वराज्य, न्याय आणि लोककल्याणाच्या विचारांचा विजय होता. या पवित्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपतींची शिवशाही ते आजची लोकशाही” या विषयावरील निबंध स्पर्धेला चंद्रपूरकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अत्यंत आनंद होत आहे. विशेषतः युवक, युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून इतिहासाविषयी असलेली आपली आस्था आणि सामाजिक जाणीव सिद्ध केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शासनव्यवस्थेत न्याय, पारदर्शकता, शिस्त, स्त्रीसन्मान आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य होते. आज आपण ज्या लोकशाही व्यवस्थेत जगत आहोत, त्या लोकशाहीच्या अनेक मूल्यांचे बीज शिवाजी महाराजांच्या शिवशाहीत पाहायला मिळते.
या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, संशोधनाधारित आणि प्रेरणादायी विचार मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रशासन कौशल्याचा, राष्ट्रप्रेमाचा, शौर्याचा आणि लोककल्याणकारी धोरणांचा सखोल अभ्यास करून उत्कृष्ट निबंध सादर केले. आपली युवा पिढी इतिहास समजून घेण्याचा आणि त्यातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत आहे, हे पाहून निश्चितच समाधान वाटते.
कोणत्याही राष्ट्राचा इतिहास हा त्याचा आत्मा असतो. ज्या समाजाला आपल्या इतिहासाचा अभिमान असतो, तो समाज भविष्यात मोठी प्रगती करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आणि स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. ही निबंध स्पर्धा त्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विजेत्या स्पर्धकांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाला स्पर्धक, विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



