ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अखेर….धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर प्लांट कंपनीकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला 5 लाखाची आर्थिक मदत मंजूर
विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात कंपनी प्रशासनासोबत चर्चा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर प्लांट कंपनीमध्ये कार्यरत असलेले कामगार स्व. अनिल बावणे यांचा कामावर येत असताना घोडपेठ जवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, धारिवाल कंपनी कामगार संघटनेच्या माध्यमातून तसेच मा. नगरसेवक व भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात सर्व कामगारांनी एकजुटीने पुढाकार घेतला.
कामगारांनी कंपनी प्रशासनाला निवेदन देत स्व. अनिल बावणे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ठाम मागण्या केल्या. यामध्ये कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेणे, शासकीय योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे तसेच कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी आर्थिक 50 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. कामगारांच्या एकजुटीसमोर कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत अखेर सर्व मागण्या मान्य केल्या. यामुळे स्व. अनिल बावणे यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या यशस्वी पाठपुराव्यासाठी मार्गदर्शन करणारे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि नेतृत्व करणारे विशाल निंबाळकर सर्व कामगार संघटना पदाधिकारी सागर गादेवार, शंकर खांडाळकर, शुभम आसेकर, विशाल मेश्राम, बिपिन साठे यांच्या प्रयतनाने कामगारांच्या कुटुंबीयाना न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नानां यश मिळाल्याने कामगार स्व.अनिल बावणे व त्यांच्या कटुंबियामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



