हिंगणी व धामणगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढत्या वृक्षतोडीमुळे आणि कमी होत चाललेल्या हरित क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, यंदाच्या उन्हाळ्यात तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागला. भविष्यात उष्णतेचा वाढता प्रभाव टाळण्यासाठी निसर्ग संवर्धन आणि वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
याच संकल्पनेतून हिंगणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अतुल भोये व प्रशासक दामिनी डेकाटे यांच्या उपस्थितीत हिंगणी आणि धामणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात धामणगावचे पोलीस पाटील अमोल कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती बहादुरे, ग्रामपंचायत हिंगणीचे सहायक लिपिक शंकर बोरले तसेच धामणगाव येथील आरोग्य सेविका भारती जिवतोडे व परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक सहभागी झाले होते.
वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. पर्यावरणाचे रक्षण आणि पुढील पिढ्यांना निरोगी व सुरक्षित जीवन देण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



