ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर-हावडा थेट रेल्वे सेवेबाबत रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक पावले

 खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारशाह येथून हावडा (कोलकाता) साठी थेट रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे पत्र क्र. २२७५/२०२६, दिनांक ३० जून २०२६ आग्रही मागणी केली होती. या मागणीची तात्काळ गंभीर दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे संदर्भ: MR/A/4080/2026, दिनांक ७ जुलै २०२६ या विषयावर चौकशी व आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

चंद्रपूर, गडचिरोली व कागजनगर परिसरातील लाखो नागरिकांची, विशेषत, बंगाली समाजाची गेल्या ६० वर्षांपासून चंद्रपूर-बल्लारशाह ते हावडा अशी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची जुनी व रास्त मागणी आहे. सध्या थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील प्रवाशांना, व्यापाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना हावडा गाठण्यासाठी सुमारे १६० किमी दूर असलेल्या नागपूर किंवा गोंदिया स्थानकावर जावे लागते. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारशाह – चांदा फोर्ट – मूल – वडसा मार्गाने हावडासाठी नवीन गाडी सुरू करण्यात यावी अथवा सध्या सुरू असलेल्या चेन्नई-बिलासपूर एक्सप्रेस गाडी क्र. १२८५२ चा विस्तार हावडापर्यंत करण्यात यावा, या मागण्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक पावले उचलली जात असून, सदर विषयाची पडताळणी करून आवश्यक ती धोरणात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी कळवले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे चंद्रपूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या असून, लवकरच हावडा व मुंबई प्रवासासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये