शॉर्टसर्किटमुळे जिल्हा बँकेच्या राजुरा शाखेत आग ; सुरक्षा यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला
सेफ्टी ऑडिट, तांत्रिक सुरक्षा व विमा संरक्षणाचा फायदा; सीईओ कल्याणकर यांची पहाटेच पाहणी, अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनीही घेतला आढावा

चांदा ब्लास्ट
राजुरा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजुरा शाखेत रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, बँक प्रशासनाने पूर्वनियोजित केलेल्या सुरक्षा व्यवस्थेसह वेळोवेळी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, सुदैवाने कोणतीही जीवित अथवा मोठी आर्थिक हानी झाली नाही.
रात्रीच्या सुमारास राजुरा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा सक्रिय झाली. बँकेच्या शाखेत करण्यात आलेल्या तांत्रिक सुरक्षा उपाययोजना आणि पूर्वनियोजित सुरक्षा नियोजनामुळे आगीचा धोका वेळीच नियंत्रित करण्यात आला. यावेळी राजुरा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागासह पोलिस विभागाचेही तत्पर सहकार्य लाभले.
*अध्यक्ष तथा सीईओंची पाहणी*
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी पहाटे ४ वाजताच राजुरा शाखेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर सकाळी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, राजुरा विभागीय कर्ज समिती अध्यक्ष उल्हास करपे, संचालक विजय बावणे, संचालक तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही राजुरा शाखेला भेट देऊन पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.
*सर्व शाखांमध्ये तांत्रिक सुरक्षा*
जिल्हा बँक प्रशासनाने आपल्या सर्व शाखांमध्ये तांत्रिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. तसेच शाखांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेले आहे. त्यामुळे राजुरा शाखेतील आग मोठ्या नुकसानीत रूपांतरित होण्यापूर्वीच नियंत्रणात आणता आली. या पूर्वतयारीचा फायदा या घटनेत प्रकर्षाने जाणवला.
दरम्यान, बँक प्रशासनाने बँकेच्या सुरक्षेसाठी विमा संरक्षणही घेतलेले आहे. त्यामुळे अशा आकस्मिक घटनांमध्ये संस्थेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीनेही बँकेने आवश्यक खबरदारी घेतल्याचे स्पष्ट झाले.
*सकाळपासून व्यवहार सुरळीत*
घटनेनंतर आवश्यक ती पाहणी, तपासणी व सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर आज सकाळपासून राजुरा शाखेतील बँकेचे नियमित कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी बँक प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केली.
या घटनेच्या निमित्ताने बँकेच्या शाखांमध्ये करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजना, तांत्रिक तपासणी, सेफ्टी ऑडिट आणि विमा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. बँक प्रशासनाच्या पूर्वतयारीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.



