समर्थ कृषी महाविद्यालय येथे ललित कला स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव- ललित कला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले , कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, होत्या उद्घाटक डॉ. मंजुषा देशमुख तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव सतीश कायंदे, श्रीहरी ठोसर, पियुष टाकळकर, अमर चिंतळे, प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे , उपप्राचार्य प्रा. देवानंद नागरे उपस्थित होते.
अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे यांनी सांगितले की अशा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो . कला ही व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असून, विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना सातत्याने विकसित करावे असे आवाहन केले. संस्थेच्या सचिवांनी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. सचिवांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेकडे केवळ जिंकण्याच्या दृष्टिकोनातून न पाहता आपली कला आणि कौशल्य सादर करण्याची संधी म्हणून पहावे असे प्रतिपादन केले. डॉ मंजुषा देशमुख यांनी यानिमित्ताने विविध महाविद्यालयांमधून आलेल्या युवा कलाकारांच्या प्रतिभेचा अविष्कार आपल्याला अनुभवता येणार आहे असे सांगितले. प्राचार्य डॉ नितीन मेहत्रे यांनी प्रत्येक कलाकारांच्या मनात वेगळे विश्व आहे आणि आजच्या ह्या व्यासपीठावर व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे असे सांगून विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे यांनी या ललित कला स्पर्धा स्थळ चित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, छायाचित्रण व इन्स्टॉलेशन या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सोनाली इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा श्वेता धांडे, प्रा अनिता सानप, डॉ मनोज पटोकार, प्रा सचिन सोळंकी, प्रा विजय पवार, प्रा किशोर कव्हर तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



