पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र मोफत द्या : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी
SBI सह विविध बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तालुका भद्रावतीच्या वतीने पेन्शनधारकांना बँकेच्या शाखेतून जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) मोफत काढून देण्यात यावे, या मागणीसाठी विविध बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले.
यामध्ये भारतीय स्टेट बँक (SBI) भद्रावतीचे शाखा व्यवस्थापक मा. श्री. गजभिये सर, SBI आयुध निर्माणी चांदा शाखेच्या मा. सौ. माधवी सहारे मॅडम, बँक ऑफ इंडियाचे मा. श्री. राहुल वैद्य सर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे मा. श्री. पेटकर सर यांना निवेदन देण्यात आले.
निवृत्त कर्मचारी व पेन्शनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना वयोमानामुळे, शारीरिक अडचणींमुळे तसेच तांत्रिक प्रक्रियेतील अडचणींमुळे जीवन प्रमाणपत्र काढताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बँकांच्या शाखांमध्ये ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारकांना आवश्यक सहकार्य करून जीवन प्रमाणपत्राची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक व शारीरिक त्रास होऊ नये, त्यांना बँकेच्या माध्यमातून सुलभ सेवा मिळावी आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण व्हावे, हा या निवेदनामागील प्रमुख उद्देश.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सदस्य मा. श्री. वसंत वऱ्हाटे, जिल्हा सदस्य मा. श्री. वामन नामपल्लीवार, तालुका सचिव श्री. बाळा कुटेमाटे, कोषाध्यक्ष मा. श्री. गोपाल घुमे, मार्गदर्शक मा. श्री. शेखर घुमे आणि मा. श्री. गुलाब लोणारे उपस्थित होते.



