बल्लारशा रेल्वे स्थानकावर मध्यरात्री एकटी आढळली १८ वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी पालकांच्या केले स्वाधीन
ऑपरेशन शोध आणि दिशा उपक्रमांतर्गत पोलिसांची तत्पर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
बल्लारशा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर मध्यरात्री एकटी बसलेल्या १८ वर्षीय तरुणीला रेल्वे पोलिसांनी सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन केले. ऑपरेशन शोध V आणि दिशा उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘चिल्ड्रेन रीयुनिफिकेशन इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत संभाव्य अनुचित घटना टाळली.
दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास बल्लारशा रेल्वे पोलीस चौकीतील रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना फलाट क्रमांक २ वर मानसी राजेश बंगले (वय १८ वर्षे, रा. मौलाना आझाद वॉर्ड, बल्लारशा, जि. चंद्रपूर) ही तरुणी एकटी बसलेली दिसून आली. एवढ्या रात्री ती एकटीच असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिला चौकीत आणून विचारपूस केली.
यावेळी तरुणीने आपल्यासोबत कोणीही नसल्याचे सांगत, रेल्वेत बसून कुठेतरी निघून जाण्याचा विचार असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिची समजूत घालत रात्रीच्या वेळी एकटीने घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते, असे समजावून सांगितले. तसेच तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंबीयांना माहिती देणे आवश्यक असल्याचे पटवून दिले.
कौटुंबिक वादातून घर सोडण्याचा निर्णय
विचारपूस केली असता, मानसीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून ती आपल्या मोठ्या आईकडे राहत असल्याचे समोर आले. आदल्या दिवशी मोठ्या आईचा मुलगा शुभम याच्यासोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात घरातील कोणालाही न सांगता ती घरातून निघाली होती. त्यानंतर ती रेल्वे स्थानकावर आली होती.
पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तिची मोठी आई सुनीता मदन बंगले (वय ४५ वर्षे, रा. बल्लारशा) आणि शुभम यांना रात्री रेल्वे पोलीस चौकीत बोलावले. त्यांना तरुणीच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. तसेच तिच्याशी प्रेमाने संवाद साधावा, तिला समजून घ्यावे आणि यापुढे अशा प्रकारे ती एकटी घराबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे समुपदेशन करण्यात आले.
पोलिसांच्या समजुतीनंतर मानसीने यापुढे घरातून एकटी निघून जाणार नसल्याचे सांगितले. तिने मोठ्या आई व भावासोबत घरी जाण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पोलिसांनी तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन घरी पाठविले.
पोलिसांच्या तत्परतेचे कुटुंबीयांकडून कौतुक
तरुणीला योग्य वेळी मदत करून सुरक्षितपणे घरी पोहोचविल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित घटना टाळण्यास मदत झाली.
ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, नागपूर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी शेळके, अकोला यांच्या नेतृत्वाखाली तसेच रेल्वे पोलीस स्टेशन वर्धाचे पोलीस निरीक्षक विरसेन चंहादे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
या कारवाईत बल्लारशा रेल्वे पोलीस चौकीतील पोलीस हवालदार रवींद्र खंडारे, पोलीस शिपाई राजेंद्र फटिंग आणि पोलीस शिपाई अश्विन पनलेवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रात्रीच्या वेळी एकट्या आढळलेल्या तरुणीची सुरक्षितता सुनिश्चित करून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



