वाघोरा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेड राजा : तालुक्यातील वाघोरा येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थ्यांना नियमित व पूर्ण धान्य वाटप केले जात नसल्याचा आरोप करत संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात २३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक गणेश नागरे यांनी हे निवेदन स्वीकारले.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, गावातील पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे धान्य नियमितपणे वितरित केले जात नसल्याची तक्रार आहे. तसेच लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापेक्षा कमी धान्य दिले जात असल्याचा आणि धान्य वितरणाची पावती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. धान्य मागण्यासाठी दुकानात जाणाऱ्या नागरिकांशी दुकानदाराकडून वाद घातला जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे गावातील नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित दुकानदाराच्या कारभाराची सखोल चौकशी करून धान्य वितरणाच्या नोंदी, ई-पॉस मशीनवरील व्यवहार आणि प्रत्यक्ष धान्यसाठ्याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित दुकानदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच वाघोरा येथील पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या दुकानदारामार्फत नियमित व पूर्ण धान्य वितरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर सरपंच पती हरिभाऊ त्र्यंबक गव्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मनोहर भाऊराव गव्हाड, ग्रामपंचायत सदस्य सिद्धू गव्हाड, तुकाराम भाऊराव गव्हाड, विक्रम सुतार, शिवाजी गव्हाड, संदीप जाधव, गजानन हनवते, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव माणिकराव गव्हाड यांच्यासह दीपक खरात, बबन गव्हाड, उद्धव गव्हाड, नंद पाटील गव्हाड, मारुती नारायण गव्हाड, श्याम गव्हाड, भरत गव्हाड, अनिल मस्के, दत्ता गव्हाड, रमेश सुतार, प्रशांत सुतार, संतोष हनवते, कुंडलिक सुतार, प्रदीप काकडे, काशिनाथ कहाळे, गोपाल बिल्होरे, बाबासाहेब गव्हाड, अमोल डुकरे, हरिभाऊ उकंडे, अमोल काकडे, शरद हनवते, परमेश्वर डुकरे, चंद्रकांत गव्हाड यांच्यासह अन्य ग्रामस्थांची नावे आहेत.
या निवेदनावर तहसील प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे वाघोरा येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



