वडेट्टीवार दांम्पत्याच्या हायप्रोफाईल एंट्रीने “कही खुशी_कही गम!”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रकाशित झाल्या. यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका चर्चेत आल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार कुटुंबीयांचे गोंडपिपरी तालुक्यातील मतदार यादीत समावेशामुळे चर्चेला उधान आले. राज्यातील हेवीवेट नेते विजय वडेट्टीवारांचे धाकटे बंधू किशोर वडेट्टीवार यांचे जन्मभूमी करंजी तर गीता वडेट्टीवार यांचे माहेर असलेल्या पानोरा गावात नोंदीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. एसआयआर प्रणालीने पती – पत्नी विभागले तर नाही ना ? असे बोलले जात आहे.
किशोर वडेट्टीवार कुटुंबियांसह गडचिरोली शहरात वास्तव्याने राहतात. मात्र गोंडपिपरी तालुक्यात या हायप्रोफाईल एंट्रीने “कही खुशी_कही गम” अशी स्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा या नोंदीचे स्वागत होईल, की गावकऱ्यांकडून हरकती घेतल्या जातील, याकडे गोंडपिपरी तालुक्यासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या. आरक्षण ५०% च्या वर गेल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे. विद्यमान प्रशासकाचाही सहा महिन्याचा कालावधी झाला. असे असतांना गोंडपिपरी तालुक्यातील करंजीचे “भूमिपुत्र” असलेले विजय वडेट्टीवार राज्याचे विधिमंडळ गटनेते आणि ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. वडेट्टीवारांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार करंजीचे सरपंच होते. थोरले बंधू विलास वडेट्टीवार उपसरपंच होते. करंजी गावाच्या विकासात वडेट्टीवार कुटुंबाचे योगदान राहिले आहे. वडेट्टीवार कुटुंबियांनी गाव सोडले. मात्र गावाची बांधिलकी आणि जिव्हाळा आजही कायम आहे. संकट काळात गावाच्या मदतीला वडेट्टीवार नेहमीच धावून येतात.
असे असताना नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत करंजीत वडेट्टीवारांचे धाकटे बंधू किशोर वडेट्टीवार यांचे नाव समाविष्ट झाल्याने गावाकऱ्यांच्या भुवया उंचावल्या. तर किशोर वडेट्टीवार यांच्या पत्नी गीता वडेट्टीवार यांचे नाव तालुक्यातीलच माहेर असलेल्या पानोरा गावात नोंद झाले. आगामी दिवसात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हायप्रोफाईल एंट्रीने “कही खुशी_ कही गम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी मात्र पती-पत्नी असलेले किशोर वडेट्टीवार आणि गीता वडेट्टीवार यांचे नाव वेगवेगळ्या गावात नोंद असल्याने एकच आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या हायप्रोफाईल एंट्रीचे स्वागत होईल की, यावर हरकती घेतल्या जातील, याकडे गोंडपिपरी तालुक्यासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
*निवडणुकीची रणनीती ?*
_गोंडपिपरीत करंजी – धानापुर जि.प.क्षेत्र ‘सर्वसाधारण स्त्री’ करिता राखीव आहे. गीता वडेट्टीवारांचे नाव या साठी चर्चेत होते. वडेट्टीवारांची जन्मभूमी असलेल्या करंजीत सरपंचपद “सर्वसाधारण” करिता आरक्षित आहे. करंजी एमआयडीसीच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला महत्त्व आहे.यामुळे दुहेरी हेतूने ही एन्ट्री नाही ना. ? अशी चर्चा आहे.
*वडेट्टीवार कुटुंबीयांचे स्वागत करू*
_विजय वडेट्टीवार आणि वडेट्टीवार परिवार यांचे करंजी गावाच्या जडणघडणीत आणि विकासात मोठे योगदान राहिले आहे. संकट काळात करंजी गावाच्या पाठीशी राहणाऱ्या वडेट्टीवार परिवाराचे आम्ही गावात स्वागतच करू.
*_कमलेश निमगडे,सामाजिक कार्यकर्ता,करंजी.*
*सर्वसमावेशक निर्णय होईल*
_मी अद्याप गावची प्रारूप मतदार यादी पाहिली नाही.आम्ही गावकरी म्हणून यावर सर्व समावेशक निर्णय घेऊ.
*जनार्धन ढुमणे,प्रशासक/ सरपंच,ग्रा.पं.पानोरा*



