राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या
गुरुदेव सेवा मंडळाचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी अंतर्गत वरोरा तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्यामार्फत केंद्र व राज्य शासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्यलढा, समाजसुधारणा, ग्रामविकास, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, अस्पृश्यता निर्मूलन तसेच मानवसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून त्यांनी ग्रामविकासाचा दूरदृष्टीचा विचार मांडला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भजनांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. तसेच १९५५ मध्ये जपानमधील विश्वधर्म परिषदेत भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करून देशाचा गौरव वाढविला, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला.
राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या देशभरातील सुमारे ४० हजार शाखांमधून आजही ग्रामसफाई, व्यायाम, योग, प्रार्थना, ध्यान, व्यसनमुक्ती व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे मंडळाने नमूद केले.
गेल्या २५ वर्षांपासून भारतरत्न पुरस्काराची मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात येत असून, अद्याप निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रनिर्मिती, समाजजागृती आणि मानवतेसाठीच्या त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न जाहीर करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना लक्ष्मणराव गमे, प्रा. रुपलाल कावळे, सुवर्णा पिंपळकर, वसंतराव निखाडे, संतोषराव जीवतोडे, मनोहर पारोधे, चंद्रकला मत्ते, प्रकाश पिंपळकर, पुंडलिक कौरासे, लक्ष्मणराव कातोरे, छोटूभाऊ शेख, अविनाश ढेंगळे, पुरुषोत्तम भोयर, नामदेवराव बोढाले, दशरथ रोडे, अशोक ठेंगे, छाया कोहाडे, विजयराव पिंपळशेंडे, उमाजी खानेकर, सुनीता नरडे, शेषराव बोढे, नत्थूजी सोनटक्के, नरेंद्र मत्ते, गजानन राऊत, शंकर कुडे, श्रीकृष्ण धरफुडे यांच्यासह बहुसंख्य पुरुष व महिला गुरुदेव उपासक उपस्थित होते. निवेदनावर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.



