चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती
विशेष आर्थिक पॅकेज व केंद्रीय पाहणी पथक तातडीने पाठवा

चांदा ब्लास्ट
खा.प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे तातडीने लक्ष वेधले आहे. चालू वर्षात अनियमित, अपुरे आणि अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागांत पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके पूर्णपणे वाळली आहेत. यामुळे शेतीतील लावलेला मूळ खर्च निघणेही अशक्य झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड हवालदिल आणि मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून जनावरांसाठी चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचसोबत शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने रोजगाराचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. दुष्काळाची ही भीषण छाया केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्याला आपल्या कचाट्यात घेत आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचे मनोबल पूर्णपणे खचले आहे.
या आपत्कालीन आणि गंभीर परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. या पॅकेजच्या माध्यमातून प्रभावित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे, कर्जमाफी करणे, बियाणे व खतांवर सबसिडी उपलब्ध करून देणे तसेच पीक नुकसानीचा तात्काळ मोबदला देऊन शेतकऱ्यांना पुनरुज्जीवित करणे शक्य होणार आहे.
यासोबतच, चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दुष्काळाच्या वास्तविक तीव्रतेचे आणि नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांचे एक विशेष केंद्रीय पाहणी पथक महाराष्ट्रात पाठवावे, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हा देशाचा मुख्य आधारस्तंभ असल्याने या कठीण काळात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मोठा दिलासा द्यावा, अशी नम्र विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.



