गणेशोत्सवात गणेश मंडळांना सामाजिक उपक्रमांचे गोंडपिपरी पोलिसांचे आवाहन
अमली पदार्थमुक्ती, महिला-बाल सुरक्षा, वाहतूक शिस्त, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी पोलिस स्टेशनने तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरावे, या उद्देशाने पोलिस विभागाने विशेष उपक्रमांची संकल्पना पुढे आणली आहे.
गोंडपिपरी पोलिस स्टेशनच्या आवाहनानुसार गणेश मंडळांनी सायबर सुरक्षितता, अमली पदार्थांविरोधी जनजागृती, महिला व बाल सुरक्षा, वाहतूक सुरक्षा व जनजागृती, पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच आरोग्य तपासणी व जनजागृती या विषयांवर देखावे, पथनाट्य, जनजागृती फलक आणि सामाजिक उपक्रम सादर करावेत.
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर ठगांपासून सावध राहावे, आपली वैयक्तिक माहिती व आर्थिक माहिती सुरक्षित ठेवावी, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच अमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर वाढविणे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे, यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे की, गणेशोत्सवातील देखावे आणि उपक्रम हे केवळ आकर्षणापुरते मर्यादित न राहता समाजहिताचा संदेश देणारे असावेत. समाजातील विविध समस्या, वाढते गुन्हे, व्यसनाधीनता, सायबर फसवणूक, महिलांवरील अत्याचार आणि पर्यावरणीय प्रश्न याबाबत जनजागृती करण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा.
“सामुदायिक सर्व गणपती मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण देखावे व उपक्रम सादर करावेत,” असे आवाहन गोंडपिपरी पोलिस स्टेशन, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्रद्धेसोबत सामाजिक जबाबदारीची जोड देत ‘सुरक्षित गणेशोत्सव–आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्याचा संदेश गोंडपिपरी पोलिसांनी दिला असून या उपक्रमाला गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



