अवैध रेती वाहतुकीवर भद्रावती पोलिसांची धडक कारवाई
सहा लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त : ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई करीत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण सहा लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ ऑक्टोबर रोजी विजासन रोडवरील रेल्वे गेट परिसरात करण्यात आली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक अमोल नामदेव पोटे (वय ३८, रा. सूर्य मंदिर वॉर्ड, भद्रावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमली पदार्थ तथा अवैध धंदेविरोधी पथक विजासन रोड परिसरात गस्त घालत असताना, चारगावजवळील वर्धा नदीच्या पात्रातून अवैधपणे रेती उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे भद्रावतीकडे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विजासन रोडवरील रेल्वे गेट परिसरात पंचांसमक्ष नाकाबंदी केली.
सायंकाळी सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास लाल रंगाचा ट्रॅक्टर येताना दिसताच पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली. रेती उत्खनन व वाहतुकीसाठी आवश्यक शासकीय परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाला ताब्यात घेतले.
या कारवाईत महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, राम कंपनीची ट्रॉली आणि अंदाजे १०० फूट रेती असा एकूण सहा लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार गोपाल मधुकर आतकुलवार यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ अन्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांच्यासह पोलीस कर्मचारी देवानंद डुकरे, प्रशांत शेंदरे, अनुप आस्टुनकर, संतोष राठोड, खुशाल कावळे तसेच महिला पोलीस कर्मचारी मोनाली गारघाटे, पूजा पंधरे आणि रागिनी रायपुरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.



