राज्यातील 2.50 लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी
राज्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमात वर्धा जिल्ह्याचा समावेश

वर्धा :_ राज्यातील युवकांना उत्तम दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मॅजिक बस फाउंडेशनच्या सहयोगाने राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्याचा यात समावेश असल्याने जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षणासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपक्रमात ज्या सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यात वर्धा जिल्ह्यासह नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नाशिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. या सात जिल्ह्यांमधील 2 लाख 50 हजाराहून अधिक वंचित युवकांपर्यंत पुढील पाच वर्षांत पोहोचून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या या उपक्रमामध्ये जीवन कौशल्ये, रोजगारक्षमतेचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि रोजगाराशी जोडणी यांचा एकात्मिक समावेश आहे. महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढविणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, ग्रामीण उद्योजकता वाढविणे तसेच पदवीधर युवकांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे या शासनाच्या प्राधान्यक्रमांशी हा उपक्रम सुसंगत असल्याचे या उपक्रमास वर्धा जिल्ह्याशी जोडतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य विभागामार्फत करण्यात येईल. तसेच निधीचे अभिसरण आणि औपचारिक सामंजस्य करार करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील हजारो होतकरू युवकांना चांगले प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने हा उपक्रम जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.



