लोकमान्य विद्यालय म्हणजे शिक्षणासोबत संस्कार देणारी शाळ : आ. सुधीर मुनगंटीवार
अमृतमहोत्सवी ‘लोकामृत’ स्मरणिकेचे थाटात प्रकाशन : सोनाली कुलकर्णी यांच्याकडून मराठी माध्यमाच्या शाळेचे कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे माध्यम नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे ईश्वरी कार्य आहे. लोकमान्य विद्यालयाने गेल्या ७५ वर्षांपासून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे ही संस्था केवळ शिक्षण देणारी शाळा नसून संस्कारक्षम पिढी घडविणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन माजी अर्थ व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकसेवा मंडळ, भद्रावती संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘लोकामृत’ स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी लोकमान्य विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अमृतमहोत्सवी ‘लोकामृत’ स्मरणिकेच्या प्रकाशनाचा हा दिवस केवळ सोहळ्याचा दिवस नसून, संस्कारमय जीवनाचा संकल्प करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणे आणि त्यांच्यात उत्तम मूल्यांची रुजवण करणे, हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. लोकमान्य विद्यालयाने आपल्या प्रदीर्घ वाटचालीत ही परंपरा जपली असून, संस्थेचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही लोकमान्य विद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, आजच्या स्पर्धेच्या युगात मराठी माध्यमाच्या शाळेने आपले वेगळेपण आणि अस्तित्व टिकवून ठेवणे ही अभिमानाची बाब आहे. लोकमान्य विद्यालयातील शिस्त आणि संस्कार वाखाणण्याजोगे आहेत. संस्थाचालकांनी अनेक वर्षे परिश्रम घेऊन उभी केलेली ही शैक्षणिक परंपरा आजही पुढील पिढ्यांना घडविण्याचे काम करीत आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
अध्यक्षीय भाषणातून लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी शाळेच्या तुझ्यात वर्षाच्या वाटचाली बाबतची माहिती दिली. याही पुढे या विद्यालयाला विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप काही करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी घोषपथकाच्या साथीने मान्यवरांचे व्यासपीठापर्यंत स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे बळवंतराव गुंडावार, मनोहर पारधे, पूजा देऊरकर आरुषी बेतवार, लता इंदुरकर आणि रवी सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन अमित गुंडावार यांनी केले.
कार्यक्रमाला लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्यासह आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे, चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भद्रावती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतदादा गुंडावार,सचिव उल्हास भास्करवार, सहसचिव अमित गुंडावार, सदस्य नामदेवराव कोल्हे, गोपाल ठेंगणे, उमाकांत गुंडावार,अविनाश पामपट्टीवार,संजय पारधे, आशिष गुंडावार यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक प्रा. सचिन सरपटवार ,प्राचार्य रूपचंद धारणे तसेच लोकमान्य ज्ञानपीठच्या प्राचार्य पुनम ठावरी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सचिन सरपटवार यांनी केले. सूत्रसंचालन अस्मिता झुलकंठीवार तर प्राचार्य रूपचंद धारणे यांनीआभार मानले.
लोकमान्य विद्यालयाच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाला उजाळा देणारा आणि शिक्षण, संस्कार व शिस्तीच्या परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.



