ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वाधारच्या पैशांवर महाविद्यालयाचा “आर्थिक आधार?”

आर्थिक मदतीसाठी विद्यार्थ्यांवर दबावाचा गंभीर आरोप; चिंतामणी महाविद्यालयात भीतीचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

*सूत्रांची माहिती : विद्यार्थ्यांच्या शासकीय लाभातून महाविद्यालयासाठी आर्थिक मदत उभारण्याचा प्रयत्न?, प्राचार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

 आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शासनाने सुरू केलेल्या स्वाधार योजनेतील आर्थिक लाभाबाबत स्थानिक चिंतामणी महाविद्यालयात गंभीर प्रकार घडत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाला आर्थिक मदत करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आणि शैक्षणिक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन आणि शिक्षणावरील खर्चासाठी असताना, त्यातील काही हिस्सा महाविद्यालयाच्या हितासाठी देण्याबाबत दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, शिक्षणावर परिणाम होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे समजते.

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी असलेल्या शासकीय योजनेच्या लाभावर दबावाचे सावट असेल, तर हा प्रकार केवळ एका महाविद्यालयापुरता मर्यादित न राहता शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारा ठरू शकतो.

याबाबत चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य गिरिया यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, स्वाधार योजनेतून कोणत्याही प्रकारची मदत विद्यार्थ्यांकडून मागितली नसून, महाविद्यालयाच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी जर अशी मागणी केली असेल तर विद्यार्थ्यांनी बिनदिक्कतपणे त्या कर्मचाऱ्याचे नाव सांगितल्यास, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

*विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर प्रश्न*

स्वाधार योजना ही गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. अशा योजनेतील लाभाचा वापर विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी करण्यास प्रवृत्त केले जात असेल, तर हा प्रकार योजनेच्या मूळ उद्देशालाच बाधा पोहोचविणारा ठरू शकतो. या प्रकरणामुळे महाविद्यालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून, विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

*प्राचार्यांच्या भूमिकेवर संशय*

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या भूमिकेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शासकीय लाभातून आर्थिक मदत मिळविण्यासाठी दबावाचे तंत्र वापरले जात असल्याचा आरोप आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनामुळेच त्यांच्या मनात भीती निर्माण होत असल्याची भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

*मौनामागे दडलेली भीती?*

या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अनेक विद्यार्थी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याची चर्चा आहे. शैक्षणिक नुकसान किंवा महाविद्यालयीन स्तरावर अडचणी निर्माण होण्याच्या भीतीने विद्यार्थी मौन बाळगत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची गोपनीयता राखून प्रशासनाने स्वतंत्रपणे चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

*तातडीच्या चौकशीची मागणी*

जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग आणि उच्च शिक्षण विभागाने या आरोपांची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

स्वाधार योजनेतील लाभाबाबत विद्यार्थ्यांवर कोणत्याही स्वरूपाचा दबाव टाकण्यात आला का? महाविद्यालयासाठी आर्थिक मदत मागण्यात आली का? आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यामागे नेमकी कारणे कोणती? या प्रश्नांची उत्तरे चौकशीतून समोर येणे आवश्यक आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये