ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकाभिमुख प्रशासनातूनच शासनाच्या योजनांचे उद्दिष्ट साध्य होईल – आ. जोरगेवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या वतीने 'महाराजस्व अभियान': विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व मंजुरी आदेशांचे वितरण

चांदा ब्लास्ट

 शासनाच्या लोककल्याणकारी योजना केवळ शासननिर्णयांपुरत्या मर्यादित न राहता त्या समाजातील शेवटच्या आणि गरजू नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला कोणत्याही अडथळ्याविना शासकीय योजनांचा लाभ मिळणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन जनहिताचे निर्णय घेत असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या वतीने महानगरपालिका पार्किंग परिसरात आयोजित ‘महाराजस्व अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, मंजुरी आदेश तसेच विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार, उपायुक्त शेषराव राळे, तहसीलदार विजय पवार, भूमि अभिलेख उपअधीक्षक भुमरेड्डी गिज्जेवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, भाजप महानगर प्रभारी अर्चना देहनकर, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप महामंत्री रविंद्र गुरुनुले, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेवक भालचंद्र दानव, जितेश कुळमेथे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.,

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नये, या उद्देशाने महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी एकाच व्यासपीठावर सेवा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च या दोन्हींची बचत होत आहे. अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. माहितीअभावी अनेक नागरिक विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीवर भर देत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सक्रियपणे काम करावे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय, सन्मान आणि शासनाच्या योजनांचा लाभ सहज उपलब्ध करून देणे हेच या अभियानाचे खरे यश असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सिंधी समाज विस्थापित पट्ट्यांचे वाटप, संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पती-पत्नीच्या संयुक्त नावे ७/१२ उताऱ्यांचे वितरण, लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप, दिव्यांग कल्याण धोरणांतर्गत २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुरी, वन्यप्राण्यांमुळे पशुधन व मनुष्यहानीबाबत नुकसानभरपाईचे वितरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला बचत गटांना कर्जवाटप, कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वितरण, मोजणी क्रमांक प्रत सनद वाटप, छायाचित्रण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्जवाटप, रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभांचे वितरण तसेच बीएलओंचा सत्कार अशा विविध शासकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या जनकल्याणकारी उपक्रमांचे कौतुक करत, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये