रत्नीबाई हायस्कूल वर्धा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा व सायबर पोलीस स्टेशन, वर्धा यांच्या तर्फे ‘सायबर जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
रत्नीबाई हायस्कूल वर्धा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा व सायबर पोलीस स्टेशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व सायबर गुन्हे जनजागृती विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वर्धा येथील सायबर पोलीस स्टेशनतर्फे विद्यार्थिनी आणि नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वर्धा सायबर पोलिस स्टेशन वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री अनिल मेश्राम, तसेच पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, अंकित जिभे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांवर प्रकाश टाकला. त्यांनी खालील मुद्यांवर विद्यार्थ्यांना सावध केले.
सोशल मीडिया सुरक्षाः फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना कोणती काळजी घ्यावी. वित्तीय फसवणूकः बैंक खाते, ओटीपी (OTP) आणि लिंकद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून कसे वाचायचे त्याचप्रमाणे सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांवर भर दिला. सायबर फसवणूक टाळण्यासाठी काही प्रमुख सूचना दिल्या त्यात, अज्ञात लिंक्स किंवा अनोळखी ईमेल उघडणे टाळावे. फोन किंवा मेसेजद्वारे विचारल्यास कोणत्याही व्यक्तीसोबत आपला बँक तपशील, पिन क्रमांक किंवा ओटीपी (OTP) कधीही शेअर करू नये. मजबूत पासवर्ड वापरावे आणि नियमितपणे ते बदलत राहावे. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) चा वापर करावा, कोणतीही आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित ‘१९३०’ (१९३०) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा सायबर पोर्टलवर (cybercrime.gov.in) तक्रार नोंदवावी.
या जनजागृती कार्यक्रमाला रत्नीबाई हायस्कूलच्या प्राचार्या, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा येथील अधिकारी, सरकारी दवाखान्यातील महिला अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला रत्नीबाई हायस्कूल येथील 450 विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



