बामणीत जागतिक सायकल दिनानिमित्त जनजागृती सायकल रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दुधोली) येथे सायकल स्नेही मंडळ बामणी-बल्लारपूरच्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . यावेळी सायकल चालवा, आरोग्यवान बना , प्रदूषण हटवा आणि पर्यावरण वाचवा अशा विविध घोषवाक्याने प्रभावी जनजागृती करण्यात आली. सायकल रॅलीची सुरूवात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बामणीतून झाली . पुढे टी
पांईट, ग्रामपंचायत, गुरुनानक कॉलेज , टीचर कॉलनी मार्गाने रॅली कार्यक्रम स्थळी परत आली.
रॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र उमरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सायकल स्नेही मंडळाचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, प्रमुख अतिथी म्हणून सायकल स्नेही कैलाश खंडेलवाल , सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. मनोहर माडेकर, घनश्याम जुवारे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक साळवे गुरूजी यांनी केले . यावेळी कैलास खंडेलवाल म्हणाले की, सायकल ही इंधनविरहित वाहन असून आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. सर्व वयोगटासाठी उपयुक्त असल्याने सायकल चा वापर सर्वांनी करावा, असे ते म्हणाले. बंडोपंत बोढेकर म्हणाले की, सायकल चालवणे हे पर्यावरण पूरक जीवनशैलीचे उत्तम उदाहरण आहे. आपले मन आनंदी प्रफुल्लित ठेवायचे असेल तर सायकल चालवावी, असे ते म्हणाले . त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा यामुळे होत असते दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले डॉ. उमरे म्हणाले की , सायकल मुळे शरीराचा उत्तम व्यायाम होतो . हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते . शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी सायकलचा व्यायाम लाभदायक असतो, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन श्री. गजाननराव चिंचोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन एड. सचिन डेरकर यांनी केले.
सदर रॅली यशस्वी करण्याकरिता उमेश कडू, बंडू मोरे, कार्तिक वराटे, विलास घुंघटकर, दादाजी डेरकर, सूर्यभान मालेकर, ज्ञानेश्वर काटोले, भास्कर फरकाडे, गणेश उरकुडे, राजेश बट्टे , राकेश लोणारे, सचिन बरडे, रवींद्र गेडाम , दिवाकर निखाडे , अंकुश साळवे, विनोद मोरे, देवराज वाढई , मोरेश्वर काटोले आदींनी अथक परिश्रम घेतले.



