नागरी समस्यांवर कार्यवाही करून उपयोजना तात्काळ न केल्यास भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी शहराच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी:- शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत भारतीय जनता पार्टी, ब्रम्हपुरी शहरच्या वतीने आज नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.भाजप चे नगरसेवक मनोज भूपाल यांच्या सहकार्याने शहरातील समस्यांन बाबद आढाव बैठक नगरपरिषद येते शहरातील पाणीटंचाई, नाल्यांची अपूर्ण सफाई, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधा, बंद पडलेले ट्रॅफिक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे, अतिक्रमणाचा प्रश्न आदी गंभीर विषय या निवेदनाद्वारे मांडण्यात आले.
निवेदन स्वीकारल्यानंतर ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत सुमारे दोन तास सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील विविध प्रभागांतील समस्या आणि नागरिकांच्या अडचणींबाबत सखोल चर्चा करण्यात आली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या प्रभागातील स्थानिक प्रश्न मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडले तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांची माहिती दिली.
बैठकीत विशेषतः शहरातील तीव्र पाणीटंचाई, रेल्वे फाटकाच्या पलीकडील भागात तातडीने नवीन नळ कनेक्शन उपलब्ध करून देणे, पाण्याची कमतरता असलेल्या भागांमध्ये शासकीय निधीतून अतिरिक्त बोअरवेल उभारणे, भूमिगत गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, नाल्यांच्या सफाईनंतर रस्त्यांवर पडून असलेला मलबा हटविणे, नियमित कचरा उचल व्यवस्था सुरू करणे तसेच शहरातील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली.
मुख्याधिकाऱ्यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले. तसेच विविध प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष डॉ. सुयोगकुमार वा. बाळबुधे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज भूपाल,पवन जयस्वाल,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा.प्रकाशजी बागमारे,माजी अध्यक्ष अरविंद नंदुरकर,माजी नगरसेवक मनोज वठे,स्वप्नील अलगदेवे,महिला अध्यक्ष वर्षा चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष अमित रोकडे, ओबीसी सेल चे अध्यक्ष दिलीप जुंबळे,भाजप जिल्हा सचिव साकेत भानारकर,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तनय देशकर,अनुसूजीत जातीचे अध्यक्ष प्रकाश लोखंडे,राजू भागवत,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रश्मीताई पेशन,मंजिरीताई राजनकर,रत्ना दंडवते,चेतना येवले, दत्ता येरावार, अंकज कानझोडे,बंटी येरावर, डॉ.अशोक सालोटकर,केतन पेशन,वर्षा जोशी, घनश्याम सूर्यवंशी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत भाजप सातत्याने पाठपुरावा करणार असून प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



