घोडपेठ येथे भीषण अपघात
हेल्मेट असूनही दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील घोडपेठ येथे रविवारी (दि. १९ जुलै) दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीमुळे (चुरी) दुचाकी घसरल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृतकाचे नाव अनिल सुधाकर बावणे (रा. शिवाजीनगर, भद्रावती) असे असून, ते आपल्या क्टिवा (क्रमांक MH-34-CS-7875) यात दुचाकीने भद्रावतीहून चंद्रपूरकडे ड्युटीवर जात होते. घोडपेठ परिसरात महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीवरून दुचाकीचा ताबा सुटल्याने वाहन घसरले. त्याचवेळी मागून येत असलेल्या ट्रक (क्रमांक RJ-17-CB-3519) खाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातातील विशेष बाब म्हणजे अनिल बावणे यांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की हेल्मेटचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. हेल्मेट असूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही, यामुळे अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
रस्त्यावर पडलेली बारीक गिट्टी हा अपघातास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, याबाबत सखोल तपास सुरू आहे. संबंधित ट्रक, चालक तसेच अपघाताच्या सर्व परिस्थितीची चौकशी भद्रावती पोलीस करीत असून, पुढील तपास सुरू आहे.



