आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन बहिणींना मदतीची गरज
शिक्षण, आरोग्य व संगोपनासाठी स्व. श्रीनिवासराव शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गवराळा येथील स्व. अनिल मिटपल्लीवार यांच्या दोन मुलींवर आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यासमोर शिक्षण, आरोग्य आणि संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कु. संध्या आणि कु. तेजू या दोन्ही बहिणींना आधार देण्यासाठी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई सौ. सुरेखा अनिल मिटपल्लीवार यांचेही १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे दोन्ही मुली अनाथ झाल्या आहेत.
कु. संध्या ही लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथे इयत्ता अकरावीमध्ये, तर कु. तेजू ही कर्मवीर विद्यालय, गवराळा येथे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. तेजूला दृष्टीदोष असल्याने तिच्या वैद्यकीय उपचारांचीही आवश्यकता आहे.
दोन्ही मुलींचे शिक्षण सुरू राहावे, त्यांना शैक्षणिक साहित्य, आरोग्यसेवा, निवास आणि दैनंदिन गरजा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-सचिव यांनी या मुलींना मदतीचा हात देण्याची तयारी दर्शविली आहे. दत्तकत्वाची औपचारिकता पूर्ण करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यविषयक गरजा आणि संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील राहणार आहे. या मदतीमुळे दोन्ही बहिणींना आत्मनिर्भर होण्यासाठी बळ मिळणार आहे.



