लोकमान्य विद्यालयात अमृतमहोत्सवी ‘लोकामृत’ स्मरणिकेचे प्रकाशन
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिक्षण, संस्कार आणि शिस्तीची परंपरा जपत गेली ७५ वर्षे विद्यार्थी घडविणाऱ्या लोकसेवा मंडळ, भद्रावती संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘लोकामृत’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. माजी अर्थ व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळ, भद्रावतीचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भद्रावती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतदादा गुंडावार आणि माजी सचिव मनोहरराव पारधे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
७५ वर्षांचा इतिहास, आठवणींचा अमूल्य ठेवा!
एखाद्या शैक्षणिक संस्थेचा अमृतमहोत्सव म्हणजे केवळ वर्षपूर्तीचा सोहळा नसून, त्या संस्थेने समाजजीवनावर उमटविलेल्या ठशांचा आणि घडविलेल्या पिढ्यांच्या योगदानाचा गौरव असतो. लोकमान्य विद्यालयाने शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, सामाजिक जाणीव आणि कर्तृत्वाची प्रेरणा रुजविण्याचे कार्य केले आहे. या ७५ वर्षांच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण घडामोडी, यशस्वी विद्यार्थी, शिक्षकांचे योगदान आणि संस्थेशी निगडित आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या दृष्टीने ‘लोकामृत’ स्मरणिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा प्रकाशन सोहळा संस्थेच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव करणारा, जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि भावी शैक्षणिक वाटचालीस नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे.
या सोहळ्याला माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, हितचिंतक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकसेवा मंडळ तसेच लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



