आठ दिवस रस्ता बंद, तरी एका दिवसातच रस्ता उखडला!
गडचांदूर–लखमापूर रेल्वे फाटकावरील दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
रेल्वे विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांची नाराजी
गडचांदूर–लखमापूर रस्त्यावरील रेल्वे फाटक क्रमांक ११ (LC No. 11/GDCR) येथे दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल आठ दिवस रस्ता बंद ठेवण्यात आला.
मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच रस्ता उखडल्याचा प्रकार समोर आल्याने रेल्वे क्रॉसिंगवरील लेव्हलिंग व मेटलचे कामही अपूर्ण असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, रेल्वे विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेल्वे फाटकावरील दुरुस्तीच्या कामासाठी हा मुख्य रस्ता सलग आठ दिवस बंद ठेवण्यात आला होता. या काळात नागरिकांनी आणि वाहनधारकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता टिकाऊ, मजबूत आणि सुरक्षित होईल अशी सर्वसामान्य नागरिकांची प्रामाणिक अपेक्षा होती.
परंतु, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्याचा पार बोजवारा वाजला आहे. गिट्टी आणि खडी सुटी झाल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे. आठ दिवस रस्ता बंद ठेवूनही जर एका दिवसात रस्ता खराब होत असेल, तर या कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या रेल्वे फाटकाजवळील रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून खड्ड्यांची समस्या कायम आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते, तर याच परिसरात अनेक अपघात अपघात झाले आहे. त्यामुळे रेल्वे फाटक परिसरातील रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
अशा परिस्थितीत रेल्वे फाटकावरील रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी करून उपयोग होणार नाही. रस्ता वारंवार खराब होण्यामागील कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
आठ दिवस रस्ता बंद ठेवूनही दुरुस्तीचा दर्जा टिकत नसेल, तर या कामाचा उपयोग काय? दुरुस्तीच्या नावाखाली केवळ थातूरमातूर काम झाले का, “दुरुस्तीच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी. अन्यथा रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करून रेल्वे बंद करू
हरीशचंद्र थिपे, सामाजिक कार्यकर्ते लखमापूर
गडचांदूर–लखमापूर रस्त्यावरील रेल्वे फाटक क्रमांक ११ (LC No. 11/GDCR) येथे दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल आठ दिवस रस्ता बंद ठेवून रेल्वे क्रॉसिंगवरील लेव्हलिंग आणि मेटलचे काम केले आहे उर्वरित काम लवकरच करू
कृष्ण प्रसाद, विभागीय अभियंता रेल्वेमार्ग माणिकगड



