आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी पुन्हा सुरू
आ.मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिले होते महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश

चांदा ब्लास्ट
NSAP पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर; वृद्ध, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा
आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मानले आभार
चंद्रपूर : केंद्रपुरस्कृत सामाजिक सुरक्षा योजनांच्या नोंदणीदरम्यान NSAP (National Social Assistance Programme) पोर्टलवर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी रखडली होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून, सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे हजारो पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बंद झालेल्या नोंदणी प्रक्रियेमुळे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या महत्त्वाच्या योजनांपासून अनेक पात्र लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. नोंदणी होत नसल्याने नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
ही बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून NSAP पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली करत तांत्रिक अडचणी दूर केल्या असून, सामाजिक सुरक्षा योजनांच्या नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आता कोणत्याही अडथळ्याविना अर्ज सादर करून योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
याबाबत समाधान व्यक्त करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हीच आपली भूमिका आहे. पात्र लाभार्थी केवळ तांत्रिक अडचणींमुळे योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी हा पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन आवश्यक निर्देश दिल्यामुळे हजारो गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी पुन्हा सुरू झाली असून, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील हजारो पात्र वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ आता अधिक सुलभ आणि प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



