ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यामुळे गोंडपिपरीतील नागरिक संतप्त!

वॉर्ड क्रमांक १३ मधील मानवी वस्तीकडे दुर्लक्ष., निर्जन भागात मात्र कोट्यवधींच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह ; नागरिकांचा उपोषणाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गोंडपिपरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून शहराच्या विकासासाठी विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील नागरिकांना आजही मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल तीन वर्षांपासून रस्त्याच्या खडीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी प्रलंबित असून पावसाळ्यात चिखलाच्या साम्राज्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.

गोंडपिपरी शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये पत्रु बक्षी, सुनील झाडे ते सोनाली मेश्राम यांच्या घरापर्यंत खडीकरण व सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी, आमदार देवराव भोंगळे, नगरपंचायत प्रशासन, मुख्याधिकारी तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, तीन वर्षांचा कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत असून नागरिकांना दैनंदिन ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शहरातील विकास निधीच्या वापराबाबत पारदर्शकता ठेवण्यासोबतच, मानवी वस्त्यांना प्राधान्य देऊन वॉर्ड क्रमांक १३ मधील रखडलेल्या रस्त्याचे खडीकरणासह सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम तत्काळ मंजूर करून बांधकाम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

एकीकडे गोंडपिपरी शहराच्या विकासाचे गाजावाजा केले जात असताना दुसरीकडे तीन वर्षापासून एका वस्तीसाठी रस्ता उपलब्ध होत नसल्याने विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता नगर पंचायत प्रशासन आश्वासनापलीकडे जाऊन प्रत्यक्षात रस्त्याचे काम कधी सुरू करते, याकडे वॉर्ड क्रमांक १३ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

*निर्जन भागात रस्ते, वस्तीत मात्र प्रतीक्षा?*

 वॉर्ड क्रमांक १३ मधील रस्त्याची मागणी तब्बल तीन वर्षांपासून सुरू असताना, आधीच काही निर्जन किंवा मानवी वस्ती नसलेल्या भागात सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे “माणसे महत्त्वाची की कॉंक्रीट?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ज्या ठिकाणी नागरिकांची वस्ती आहे, तेथे मूलभूत रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी निर्जन भागातील रस्त्यांना प्राधान्य का दिले जात आहे, असा प्रश्नही चर्चेचा विषय ठरत आहे.

*दुजाभावाचा आरोप; उपोषणाचा इशारा*

मानवी वस्ती असूनही या भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. परिसरात अनुसूचित जाती-जमातीसह सर्वसामान्य नागरिकांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, विकासकामांमध्ये या वस्तीकडे दुजाभावाने पाहिले जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास उपोषणासारखे तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

*भूखंडांच्या किमती वाढविण्यासाठीचा खटाटोप?*

गोंडपिपरी शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत निर्जन व निर्मनुष्य भागात करण्यात येणाऱ्या रस्ते विकासकामांमुळे त्या परिसरातील भूखंडांचे महत्त्व आणि बाजारभाव वाढविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा संशयही काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांच्या नियोजनाबाबत पारदर्शकतेची मागणी जोर धरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये