वर्धा पॅसेंजरची वेळ बदला, नवी ‘इंटरसिटी’ सुरू करा
मंजूर एलटीटी-बल्लारशाह ट्रेन तात्काळ सुरू करण्याची खा. धानोरकर यांची महाव्यवस्थापकांकडे मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : प्रलंबित रेल्वे प्रश्न, उड्डाणपुलांची व अंडरपासची संथ गतीने चाललेली कामे आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांवरून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे भूमिका मांडली आहे. नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव व विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध मागण्यांचा धडाका लावला. या बैठकीस खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार बंटी साहू, खासदार अमर काळे, खासदार अनिल बोंडे, खासदार दुर्गादास उईके, खासदार अनुप धोत्रे, खासदार स्मिता वाघ आणि खासदार बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेल्वे मंत्रालयाने मे २०२६ मध्येच मंजूर केलेल्या आणि वेळापत्रक जाहीर झालेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह (२२१०७/२२१०८ व २०१०५/२०१०६) या थेट मुंबई एक्सप्रेसला चार महिने उलटूनही प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यात आलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबईसाठी थेट गाडी उपलब्ध नसल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व रुग्णांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही मंजूर ट्रेन तात्काळ सुरू करून चंद्रपूर-विदर्भातील प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बैठकीत केली.
यासोबतच बैठकीदरम्यान दिलेल्या निवेदनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पायाभूत सुविधांच्या कामांवरील विलंबावर बोट ठेवले. वरोरा आणि भद्रावती शहरातील अंडरपास पुलांच्या कामावर तात्काळ कार्यवाही करावी, तसेच वणी, चिखलगाव, नागरी-हिंगणघाट (गेट क्र. १९) आणि भद्रावती ते विजासन येथील रेल्वे उड्डाणपुलांची संथ गतीने चाललेली कामे त्वरित पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय विरूर ते खांबाडा रेल्वे ट्रॅकवर नवीन अंडरपास निर्माण करावा आणि वरोरा येथे मीनाक्षी बोनसुल व त्यांच्या कुटुंबाला मानवतावादी आधारावर निवास मंजुरी द्यावी, हे मुद्देही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रवाशांच्या दैनंदिन सोयींसाठी वर्धा पॅसेंजर सकाळी ६:३० चंद्रपूरला निघते त्याऐवजी ७:४० वाजता निघतांना विदर्भ व दुरंतो एक्सप्रेससाठी कनेक्टिंग ट्रेन उपलब्ध करून देणे, विद्यार्थी व व्यापाऱ्यांसाठी नागपूर – बल्लारपूर नवी ‘इंटरसिटी एक्सप्रेस’ सुरू करणे आणि नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये ४ अतिरिक्त कोच वाढवून तिला सुपरफास्ट दर्जा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुलभ सुविधा देण्याचे आश्वासन दिले.



