इरई ढाब्यावर अवैध विदेशी दारूचा साठा जप्त
भद्रावती पोलिसांची कारवाई : ७ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कवटी फाटा परिसरातील ‘इरई ढाबा’ येथे अवैधरीत्या विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला दारूसाठा भद्रावती पोलिसांनी धाड टाकून जप्त केला. या कारवाईत विविध कंपन्यांची बीअर व विदेशी दारू असा एकूण ७ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शैलेश गणपतराव आवळे (वय ४५, रा. यशवंत नगर, पडोली, ता. जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी परी पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कवटी फाटा येथील इरई ढाब्यावर पंचांसमक्ष धाड टाकण्यात आली. ढाब्याच्या काउंटरसमोरील बंद खोलीची तपासणी केली असता तेथे विविध नामांकित कंपन्यांची बीअर व विदेशी दारू बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान कार्लसबर्ग, हायवर्ड्स ५०००, टुबर्ग या ब्रँडच्या बीअर कॅनसह Oaksmith, Imperial Blue, All Seasons, Royal Green, Iconiq White आणि Royal Stag या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ हजार ८५ रुपये आहे.
याप्रकरणी आरोपी शैलेश आवळे याच्याविरुद्ध कलम ६५ (ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अंमलदार गोपाल आतकुलवार, प्रशांत शेंद्रे, देवानंद डुकरे, विजय तलांडे व मपोअं. मोणाली गारघाटे यांच्या पथकाने केली.



