मासळ येथे भररात्री घरफोडी : आठ तोळे तीन ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास
रस्त्यालगतच्या घराला चोरट्यांनी केले लक्ष्य : भद्रावती पोलिसांकडून तपासाला वेग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मासळ येथे रस्त्यालगत असलेल्या एका घरात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर घरफोडी करून तब्बल आठ तोळे तीन ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवार, २ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मासळ येथील गजानन रमेश क्षीरसागर यांच्या रस्त्यालगतच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील स्त्रीधनासह सोन्याचे विविध दागिने चोरून नेले. याप्रकरणी सौ. रुपाली गजानन क्षीरसागर, रा. मासळ, ता. भद्रावती यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास केला जात आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष बाकल व परीक्षाविधीन पोलिस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वीरेंद्र केदारे यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पोलिस अंमलदार योगेश घाटोळे व संतोष राठोड यासह पथक तपास करीत आहे.
चोरीच्या घटनेचा कसून तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.



