चंदनखेड्यात अवैध दारूसाठ्यावर पोलिसांचा छापा
१४ हजारांचा मुद्देमाल जप्त : आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंदनखेडा येथील स्मशानघाट परिसरात अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १४ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी कदीर पठाण हा नाल्यालगतच्या जंगल मार्गाने पसार झाला.
१ सप्टेंबर रोजी कारवाई : भद्रावती पोलीस ठाण्यातील अंमलदारांना चंदनखेडा येथील स्मशानघाटाजवळ कदीर मुस्तफा खान पठाण (रा. चंदनखेडा, ता. भद्रावती) हा बेकायदेशीररीत्या दारू बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच कदीर पठाण याने नाल्याच्या जंगल मार्गाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता दोन पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेला देशी व विदेशी दारूसाठा आढळून आला.
जप्त दारूसाठा असा—
रॉकेट संत्रा देशी दारू, ९० मिलीच्या २०० निपा — ८ हजार रुपये
रॉकेट संत्रा देशी दारू, ९० मिलीच्या १०० निपा — ४ हजार रुपये
सह्याद्री गोल्ड विदेशी दारू, १८० मिलीच्या ५ काचेच्या निपा — ९०० रुपये
सह्याद्री गोल्ड विदेशी दारू, ९० मिलीच्या ११ काचेच्या निपा — १,१०० रुपये
अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कदीर मुस्तफा खान पठाण याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार प्रशांत शेंद्रे, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर, विजय तलांडे, महिला पोलिस अंमलदार मोनाली गारघाटे आदींनी पार पाडली.



