ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निराधार लक्ष्मी भोयर यांना घरकुलाची प्रतीक्षा; आवास यादीतील ७० वा क्रमांक संतापजनक!

मोडकळीस आलेल्या घरात वृद्ध महिलेचे हाल; पात्र असूनही घरकुलापासून वंचित असल्याचा आरोप, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील निराधार व वृद्ध महिला लक्ष्मी भोयर या अनेक वर्षांपासून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोडकळीस आलेल्या घरात जीवन जगत आहेत. पावसाळ्यात गळणारे छप्पर, जीर्ण भिंती आणि असुरक्षित निवाऱ्यात दिवस काढावे लागत असतानाही त्यांना अद्याप प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे, आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीत त्यांचा ७० वा क्रमांक असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

लक्ष्मी भोयर यांचे घर अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. वृद्धापकाळात सुरक्षित निवाऱ्याची सर्वाधिक गरज असताना त्यांना घरकुलासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत खऱ्या अर्थाने गरजू व निराधार व्यक्तींना प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गावातील पहिल्या लाभार्थ्यांच्या यादीत राजकारणातील काही सक्षम व लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचा समावेश झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे यादीत असल्याचा दावाही काही नागरिकांनी केला आहे.

यामुळे खरोखरच गरजू असलेल्या लक्ष्मी भोयर यांच्यासारख्या वृद्ध महिलेला घरकुलासाठी ७० व्या क्रमांकावर प्रतीक्षा करावी लागत असल्याची बाब संतापजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेची चौकशी करून पात्र आणि अत्यंत गरजू नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी लक्ष्मी भोयर यांना तातडीने घरकुल मंजूर करून सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवास योजनेची लाभार्थी यादी तपासावी आणि वृद्ध निराधार महिलेवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

*“मन हेलावणारी वस्तुस्थिती”*

लक्ष्मी भोयर यांचे वास्तव अत्यंत विदारक असून, पावसाळ्यात त्यांच्या घरात राहणेही धोकादायक बनले आहे. शासनाच्या घरकुल योजनांचा खरा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहे का, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. आता प्रशासन लक्ष्मी भोयर यांच्या घरकुलाच्या प्रश्नाकडे किती तत्परतेने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये