जि. प. उ. प्रा. शाळा देवाडा (खुर्द) येथे द्वितीय शिक्षण परिषदेचे उत्साहात आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, देवाडा (खुर्द) येथे देवाडा केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण, नियोजनबद्ध आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाली. या परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षा तसेच विविध प्रशासकीय विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश बुरांडे होते. उद्घाटक म्हणून श्री प्रतीक बोंद्रे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पोंभुर्णा उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री धनराज आवारी, केंद्रप्रमुख श्री संजय झोडे, मुख्याध्यापिका डॉ. सौ. अल्का ठाकरे आणि राष्ट्रमाता विद्यालयाचे प्राचार्य श्री संदीप बद्दलवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘आणापान साधना’ उपक्रमाने झाली. गटशिक्षणाधिकारी श्री प्रतीक बोंद्रे यांनी वर्गातील शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवावी, प्रभावी अध्यापन कसे करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री धनराज आवारी यांनी शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर प्रकाश टाकला.
यावेळी प्रशांत नंदनवार यांनी PGI (Performance Grading Index) विषयी मार्गदर्शन केले. दीक्षा करमे यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि शाळेतील उपस्थिती वाढविण्याबाबत विचार मांडले, तर कु. सीमा सिडाम यांनी SNA-SPARSH अंतर्गत शालेय आर्थिक व्यवहारांची माहिती दिली. केंद्रप्रमुख श्री संजय झोडे यांनी प्रास्ताविक करून विविध प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले.
उद्घाटन सोहळ्याचे संचालन विद्यार्थिनी कु. नृत्यश्री देउरमल्ले आणि कु. परी सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. स्वरा गद्देकार यांनी केले.
या शिक्षण परिषदेला देवाडा केंद्रातील सर्व शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती लाभली. परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री अशोक पानसे, श्री निलेश गिरडकर, श्री गजानन सावलीकर, सौ. शामला तरवटकर, सौ. सुधा धामणगे, श्री अनिल भसारकर आणि श्री रोहिदास काटकर यांनी उत्कृष्ट नियोजन केले. समारोपावेळी केंद्रातील सर्व शिक्षकांनी देवाडा (खुर्द) शाळेच्या शिक्षकांचे यशस्वी आयोजनाबद्दल विशेष कौतुक केले.



