ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासगी कंपनीला देण्यात आलेली NOC रद्द करण्याची मागणी; प्रशासनाच्या मौनाविरोधात समिती आक्रमक, भंते रत्नमनी थेरो ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणावर

शांतिनगर बुद्ध विहाराच्या NOC वरून वाद चिघळला; बोधी वृक्ष आणि धम्मध्वजाच्या संरक्षणासाठी आता आरपारची लढाई

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : शांतिनगर येथील बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र, परिसरातील पवित्र बोधी वृक्ष तसेच धम्मध्वजाच्या संरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. धार्मिक व आध्यात्मिक स्थळाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी ७ सप्टेंबर २०२६ पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र समितीचे अध्यक्ष भंते रत्नमनी थेरो करणार आहेत.

समितीचा मुख्य आक्षेप शांतिनगर बौद्ध विहारासंदर्भात Lloyds Metal Company ला देण्यात आलेल्या NOCवर आहे. ही NOC तातडीने रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी समितीने केली आहे. त्याचबरोबर बुद्ध विहार, पवित्र बोधी वृक्ष आणि धम्मध्वजाचे अस्तित्व तसेच परिसरातील धार्मिक वातावरण सुरक्षित ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

केवळ इमारत नाही, श्रद्धा आणि धम्माचे केंद्र

समितीच्या म्हणण्यानुसार बौद्ध विहार म्हणजे केवळ एक इमारत नाही. ते बौद्ध समाजाच्या श्रद्धा, धम्म आचरण, ध्यान साधना आणि सामाजिक एकतेचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. विहार परिसरातील बोधी वृक्षाला बौद्ध समाजामध्ये विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे धम्मध्वज हा भगवान बुद्धांच्या धम्माचे प्रतीक आहे.

त्यामुळे विहार, बोधी वृक्ष आणि धम्मध्वजाच्या संरक्षणाबाबत कोणतीही तडजोड अथवा दुर्लक्ष समितीला मान्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वारंवार निवेदने, बैठका; तरीही प्रश्न कायम

या प्रकरणी प्रशासन, नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली असून बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र, अद्यापही समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याचा दावा समितीने केला आहे.

प्रशासनाकडून अपेक्षित निर्णय होत नसल्याने अखेर लोकशाही आणि संविधानिक मार्गाने शांततामय आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ७ सप्टेंबरपासून सुरू होणारे आंदोलन प्रशासनासाठीही मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

प्रशासनासमोर समितीच्या आठ ठोस मागण्या

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत—

1. शांतिनगर बौद्ध विहारासंदर्भात निजी Company ला देण्यात आलेली NOC तात्काळ रद्द करण्यात यावी.

2. बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्राचे संरक्षण करण्यात यावे.

3. विहार परिसरातील पवित्र बोधी वृक्षाचे संरक्षण करण्यात यावे.

4. परिसरातील धम्मध्वज/बौद्ध ध्वजाचे संरक्षण करण्यात यावे.

5. विहार परिसरातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरण अबाधित ठेवण्यात यावे.

6. विहार, बोधी वृक्ष आणि धम्मध्वजाच्या अस्तित्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने खात्री करावी.

7. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर व योग्य निर्णय घेण्यात यावा

8. बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना आणि संविधानिक अधिकारांचा सन्मान करण्यात यावा.

७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण; प्रशासन काय भूमिका घेणार?

७ सप्टेंबरपासून प्रस्तावित आमरण उपोषणामुळे आता प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे. समितीने आंदोलन शांततामय, लोकशाहीवादी आणि संविधानिक मार्गाने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात अध्यक्ष भंते रत्नमनी थेरो यांच्यासह कार्याध्यक्ष सुमेध पाटील, उपाध्यक्ष भंते संघरक्षीत थेरो, भंते अम्मतम, भंते शिलरक्षीत, भारती निमसटकर, कोषाध्यक्ष प्रज्योत गोरघाटे, सचिव भिमेंद्र कांबळे, सहकोषाध्यक्ष ममता निमसटकर, सहसचिव सविता मडपे/माला मेश्राम यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत.

बौद्ध समाजासह नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र समितीच्या वतीने बौद्ध समाजबांधव, घुग्घुसकर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आता प्रश्न केवळ NOCचा राहिलेला नसून श्रद्धा, धार्मिक स्थळाचे संरक्षण आणि प्रशासनाच्या भूमिकेचा बनला आहे. ७ सप्टेंबरपूर्वी प्रशासन ठोस निर्णय घेणार का, की शांतिनगरमध्ये आमरण उपोषणाचा मार्गच स्वीकारावा लागणार? याकडे आता घुग्घुसकरांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये