ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी आमदार विजय वडेट्टीवार मैदानात

विशेष बैठकीची केली मागणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, सेवा नियमितीकरण आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांबाबत माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्याकडे विशेष बैठकीची मागणी करून या प्रश्नाला पुन्हा एकदा राज्यस्तरावर वाचा फोडली आहे.

महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार वडेट्टीवार यांनी मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, राज्यभरातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशनमध्ये कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचारी गेली 10 ते 20 वर्षापासुन प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. ग्रामीण भागात सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि जनजागृतीसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांचे मोठे योगदान असूनही त्यांच्या सेवा नियमितीकरणासह अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तातडीने विशेष बैठक बोलावून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, प्रलंबित मागण्या आणि सेवा नियमितीकरणाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी ठाम मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

याशिवाय, दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून शासनाने त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि त्यांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा विषय पावसाळी अधिवेशनात गांभीर्याने उचलल्यामुळे राज्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. शासन लवकरच विशेष बैठक आयोजित करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

आमदार विजय वडेट्टीवार यांची आज कृती समितीच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. यावेळी चंद्रपूर चे प्रवीण खंडारे, कृष्णकांत खानझोडे गडचिरोलीचे अमित माणूसमारे, प्राशिष कोंडबात्तूवार, अमित कुंडे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये