ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सभोवतालचा समाजच सदानंद बोरकरांच्या नाट्यकृतीचे विद्यापीठ  पद्मश्री परशुराम खुणे 

 नवरगावात 'दोन घराचं गाव' नाट्य पुस्तकाचे प्रकाशन 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- नवरगाव हे नाट्य पंढरी आहे. माझी वाटचाल याच गावातून झाली. ही भूमी प्रेरणा देणारी आहे. याच मातीतील सर्वगुणसंपन्न हिरा म्हणजे सदानंद बोरकर. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, अभिनेते म्हणून सदानंद बोरकर यांनी महाराष्ट्राबाहेर आपल्या कर्तुत्वाने छाप सोडली. ‘दोन घराचं गाव’ हे नाटक सामाजिक विसंगती दर्शवत वास्तवाचा आरसा दाखवते. सभोवतालचा समाजच सदानंद बोरकरांच्या नाट्यकृतींचे विद्यापीठ असून पुढे फिल्म इंडस्ट्रीतही याचा प्रभाव पडेल, असे प्रतिपादन प्रख्यात झाडीपट्टी रंगकर्मी पद्मश्री परशुराम खुणे यांनी केले.
श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभाग आयोजित व स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित लेखक सदानंद बोरकर लिखित ‘दोन घराचं गाव’ या नाट्य पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच नवरगाव येथे पार पडले, यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी भाष्यकार म्हणून प्रसिद्ध समीक्षक व साहित्य अकादमीचे डॉ.प्रमोद मुनघाटे तर अतिथी म्हणून नाट्य आस्वादक जयंत बोरकर, गीतकार युवराज गोंगले, प्रकाशक अविनाश पोईनकर, प्राचार्य डॉ.अमृत लंजे उपस्थित होते.
सदानंद बोरकर हे नाव झाडीपट्टी रंगभूमीचे लौकिक आहे. समाजाला अंतर्मुख करून प्रबोधनाची नवी वाट दाखवणाऱ्या नाटकांची त्यांनी निर्मिती केली. ‘दोन घराचं गाव’ हे नाटक पुनर्वसनात उध्वस्त झालेल्या परिवाराची वाताहत दाखवते. झाडीबोलीतील भाषा आणि थेट रसिक-वाचकांना विचार प्रवृत्त करायला भाग पाडणारे त्यांचे हे नाटक सामाजिक प्रबोधनाची नांदी आहे, असे असे मत प्रसिद्ध समीक्षक व साहित्य अकादमीचे सदस्य डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी प्रमुख भाष्यकार म्हणून व्यक्त केले.
स्तंभ पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशक अविनाश पोईनकर यांनी प्रास्ताविकातून प्रकाशन व पुस्तक निर्मितीची भूमिका मांडली. लेखक व नाटककार सदानंद बोरकर यांनी नाट्यनिर्मितीमागील प्रेरणा सांगताना, हे नाटक लिहिण्याचा उद्देश केवळ साहित्यनिर्मिती नाही, तर समाजातील वास्तवाला कलात्मक रूप देणे आहे. रंगभूमी ही केवळ समाजाचा आरसा नसून समाजाला स्वतःचा चेहरा दाखवणारी सजग जाणीव असल्याचे मत व्यक्त केले. भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतराव बोरकर यांनी नाट्य आस्वादक म्हणून विचार मांडले. नाटकासाठी गीत व संगीत देणारे युवराज गोंगले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ.अमृत लंजे यांनी मानले. यावेळी नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो :-दोन घराचं गाव नाटकाचे प्रकाशन करताना पद्मश्री परशुराम खुणे, प्रमोद मुनघाटे, लेखक सदानंद बोरकर, अविनाश पोईनकर, जयंत बोरकर, युवराज गोंगले व मान्यवर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये