स्वप्नील मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
‘अक्षर प्रवाह फाउंडेशन, चंद्रपूर’चा शुभारंभ

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने ‘अक्षर प्रवाह फाउंडेशन, चंद्रपूर’ या संस्थेच्या कार्याची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील मेश्राम यांच्या 12 ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, श्यामनगर, चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करून वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत व्हावी आणि शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणारे शैक्षणिक साहित्य वितरित करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला.
अक्षर प्रवाह फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे, स्लम एरियातील मुला मुलींच्या शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे, हा प्रमुख उद्देश आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शैक्षणिक जनजागृती, वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन तसेच गरजू विद्यार्थ्यांना शक्य ती मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यासोबतच समाजातील नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करणे, अशा आरोग्यविषयक उपक्रमांनाही प्राधान्य देण्याचा संस्थेचा मानस आहे.
सामाजिक क्षेत्रात गरजू व वंचित घटकांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदानाबाबत जनजागृती, व्यसनमुक्तीचे संदेश, महिला सक्षमीकरण, युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे तसेच समाजात एकता, बंधुभाव आणि सहकार्याची भावना वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, या विचारातून अक्षर प्रवाह फाउंडेशनच्या कार्याची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जुनघरे, शिक्षक रमेश मेश्राम, अक्षर प्रवाह फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर ओशाखा, सचिव श्रीकांत येरकर तसेच सहसचिव सेजल चांदेकर, कोषाध्यक्ष प्रतीक्षा मावलीकर, सदस्य लक्ष्मी गोखरे, सदस्य धीरज शेंडे यांनी सहकार्य केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.



