ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीतील लूटप्रकरणाचा पर्दाफाश

३५ हजारांची सोन्याची चैन लुटणारे आरोपी जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  शहरात घडलेल्या सनसनाटी लूटप्रकरणाचा भद्रावती पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गौतम मॉल परिसरातील रहिवासी संतोष जीवनचंद गोलेच्छा (वय ५१) यांच्यावर २५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास दोन अज्ञात युवकांनी हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व लॉकेट लुटले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी चेहऱ्यावर कापड बांधून प्रथम फिर्यादीचा रस्ता अडविला. त्यानंतर वाहनावरून खाली पाडून धारदार शस्त्र व लोखंडी हत्याराने हल्ला करून त्यांना जखमी केले. घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ५९७/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपी अहद खान पठाण (वय २३) तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून १५ ते १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व लॉकेट (किंमत ३५ हजार रुपये), काळ्या रंगाची बॉक्सर मोटारसायकल (२५ हजार रुपये), लोखंडी हातोडा (१०० रुपये) व चाकू (२० रुपये) असा एकूण ६० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार नसून कौटुंबिक अडचणीमुळे त्याने हा गुन्हा केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये